जळगाव दि.25– ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने बुधवार, ३० नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा. कांताई सभागृह (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सादरीकरण होईल.
स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्या या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
अनोखे रंगमंचीय सादरीकरण
सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.
नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.