जळगाव दि. 12 प्रतिनिधी– मध्यप्रदेशातील भोपाळ येथील यशस्विनी शिक्षा संस्थानच्या ” फायनेक्स्ट ॲवॉर्ड ॲण्ड इंटरनॅशनल एक्जीबीशन ऑफ मिनी आर्टवर्क-२०२२” मध्ये मानाचा श्री. एस. के. बाकरे इंटरनॅशनल ॲवॉर्ड जळगाव जिल्ह्यातील चित्रकार राजू बाविस्कर यांना तर जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना ‘हायली रेकेमेंडेड ॲवॉर्ड’ जाहीर झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदर्शनात जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विकास मल्हारा आणि आनंद पाटील यांचे पेंटिंग्जसुध्दा प्रदर्शित करण्यात आली आहेत.
राजू बाविस्कर यांच्या चित्रांची ललित कला अकादमीने दखल घेतली असून त्यांच्या चित्रांना बॉम्बे आर्ट सोसायटी, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी, कॅम्लिन आणि साऊथ सेंट्रल झोन यांचे पुरस्कार मिळाले आहेत.
विजय जैन यांच्या चित्रांची दोन वेळा ललित कला अकादमी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, टागोर नॅशनल प्रदर्शन, भारत भवन, राज्य कला संचालनालय मुंबई यांनी दखल घेतली असून ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटी चा २०२२ चा पुरस्कार मिळाला आहे.
देश विदशातून आलेल्या शेकडो पेंटिंग्ज, शिल्प, ड्रॉइंग, ग्राफिक्स आणि फोटोज् मधून निवडक कलाकृती मधून १४ कलाकृतींना गौरवण्यात आले आहे.
२१ सप्टेंबर पर्यंत इंदोर मधील कॅनेरिज फाइन आर्ट गॅलरी मधे चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडणार आहे.
खानदेशातील चित्रकलेतील या कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन, परिवर्तनचे अध्यक्ष श्री शंभू पाटील यांच्यासह कलाक्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चित्रकारांचे अभिनंदन केले आहे.