जळगाव दि. 15 – गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.
महात्मा गांधी उद्यानातील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, विजय मोहरील, बी. डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिजीत राऊत म्हणाले, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्यांची वास्तविक जाणिव व्हावी जेणेकरून संविधानावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल; यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.
भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरूध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य गाथा लिहली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनात शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था,समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थेची समृद्ध परंपरा समजून घेता येते.
भारतातील संस्कृती, भौगोलिक विविधेतुन समृद्ध नैसर्गिक संपदा, प्रेम सहिष्णुतेची शिकवण यामुळेच भारत म्हणजे सोन्याची खाण असे म्हटले जायचे. प्रदर्शनात पहिले पॕनेल हे ‘भारत सोने की चिडीया’ हे भारतातील नैसर्गिक सौंदर्य, वास्तू, शिल्प यासह समृद्ध वारसा दर्शविते.
ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते 1947 पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती, महात्मा गांधी आणि गांधी युगाव्दारे स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, नेताजी सुभाषचंद्र बोस सह अन्य स्वातंत्र्यविरांच्या रचनात्मक भुमिका, यासह अनेक बाबींवर तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना आपला गौरवशाली इतिहास अनुभवता येत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य अर्ध्या रात्रीच का मिळाले? असे अनेक रोचक प्रश्नाचे आकलन होते. भारतीय राष्ट्रध्वज, संविधान, स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थांनाचे भारतात विलगीकरणातुन संयुक्त भारत अशी वस्तुनिष्ठ माहीती नागरिकांना मिळते.
भारतीय राष्ट्रध्वजाचा आरंभ कसा झाला त्याची निर्मिती प्रक्रिया, काळानुसार बदलेले राष्ट्रध्वजाचे स्वरूप हा इतिहास यातून उलगडा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी संपूर्ण भारतातील राजे, राजवाडे, संस्थाने भारतात विलगिकरण कसे झाले, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची भुमिका अशी रोचक माहिती प्रदर्शनातुन नागरिकसमोर मांडली आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान कसे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता, संविधान या संकल्पनेविषयी प्रदर्शनात माहिती आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्याससहल
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.9404955300; 02572264803 यांच्याशी संपर्क करावा,असे कळविले आहे.
आय लव्ह जळगाव….
महात्मा गांधी उद्यानातील सौदंर्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईट निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पाँईटचे लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.