मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने शेअरप्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 13 लोकांना एकूण 33 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबी ने नियामक नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बाजार नियामक सेबीने या लोकांना 1 लाख ते 15 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. यामध्ये शेअरप्रोच्या उपाध्यक्षा इंदिरा करकेरा यांना 15.08 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राज राव यांना 5.16 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय बाजार नियामक सेबीने बलराम मुखर्जी, प्रदीप राठोड, श्रीकांत भालकिया, अनिल जथान, चेतन शाह, सुजित कुमार अमरनाथ गुप्ता, भवानी जथन, आनंद एस भालकिया, दयानंद जथान, मोहित करकेरा आणि राजेश भगत यांनाही दंड ठोठावला आहे.
बाजार नियामक सेबीने आपल्या 200 पानांच्या आदेशात म्हटले आहे की, या फसवणुकीमध्ये किमान 60.45 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीजचा (ऑक्टोबर 2016 मधील संबंधित शेअर्सच्या मूल्यावर आधारित) खर्या भागधारकांच्या आणि 1.41 कोटी रुपयांच्या लाभांशाचा गैरवापर करण्यात आला आहे. या फसवणुकीत अस्सल भागधारकांच्या काही असूचीबद्ध सिक्युरिटीजचाही गैरवापर करण्यात आला. त्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे.