लाहोर आणि पंजाब प्रांतातील इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करू शकते. बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली.
लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी म्हणाले, “रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे 500 आणि 400रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या.
ते म्हणाले की, बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील भाज्यांच्या पुरवठ्यावर पुरामुळे मोठा परिणाम झाला असल्याने आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढतील. रिझवी म्हणाले, “येत्या काही दिवसांत कांदा आणि टोमॅटोचा भाव किलोमागे 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे बटाट्याचा भाव 40 रुपये किलोवरून 120 किलोपर्यंत वाढला असून वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याची माहिती आहे.